नस्य || “चिकित्सा एक पण फायदे अनेक” ||
नासाहि शिरसो द्वारम |
असे आयुर्वेदाने सांगितले आहे म्हणजे नाक हे डोक्याचे (मेंदूचे) प्रवेशद्वार आहे, म्हणून डोक्याच्या भागात होणाऱ्या व्याधीवर नस्य चिकित्सा म्हणजे नाकात औषधी द्रव्याचे थेंब टाकणे, हे निश्चितच लाभदायक ठरते. आयुर्वेदातील पंचकर्मातील हि एक महत्वाची चिकित्सा आहे.

ऋतुबदल, हवामान बदल, प्रदूषण काही लोकाना अशक्य त्रासदायक असते आणि भारतासारख्या तेही पुण्यासारख्या ठिकाणी तर विचारुच नका. जरा वातावरण बदलले की, माझी एक रुग्ण अक्षरश: रडत येत असे.
मॅडम आज भयानक डोकेदुखी आहे, नाक बंद पडलंय, बिलकुल श्वास घेता येत नाहीये, रात्रभर झोपले नाहीये, उद्या कामावर जायचय हो.., या संगळ्यावर मी काही बोलण्या आधीच रुग्ण उद्गारल्या, “नस्य करुयात?”
नस्य कर्माचा अत्यायिक अवस्थेत काय उपयोग ही शंका साहजिकच तुमच्या मनात आली असेल.
ही आहे आयुर्वेदाची Emergency treatment (अत्यायिक चिकित्सा ). आश्चर्य म्हणजे लोकांचा गैरसमज असा आहे की आयुर्वेदाने खूप उशिरा फरक पडतो, आयुर्वेदात emergency solutions नाहीत. अहो काही प्रमाणात बरोबर आहे पण १००% नाही.
नस्य, रक्तमोक्षण (जळवा), बस्ती, विद्ध कर्म आणि अग्निकर्म यासारख्या चिकित्सा ह्या अत्यायिक चिकित्सा म्हणून च काम करतात. आणि यांचा गुण १००% आहे.
वास्तविक डोके, तोंड, दांत, कान आणि डोळे हे सर्व अवयव नाकाशी जोडलेले असतात. नस्य ही शरीराच्या वरच्या भागातील दोष घालविण्यासाठी केली जाते.
नस्य करण्यापूर्वी चेहऱ्याला तीळ तेल अथवा औषधी तेलाने मालीश करून शेकले जाते. नस्याचे त्याच्या परीणामानुसार शिरोविरेचन व स्नेहण असे दोन प्रकार आहेत.
- शिरोविरेचन म्हणजे शिरस्थानी जमा झालेले दोष बाहेर काढणे. ज्यावेळी टाळू, कंठ आणि शिरोभाग यामध्ये कफ जमा झालेला असतो, त्यावेळी शिरोविरेचन नस्याचा उपयोग करतात. तसेच जुनाट सर्दी, त्यामुळे निर्माण होणार डोक्याचा जडपणा, जिभेला चव नसणे, डोकेदुखी, अर्धशिशी, आकडी येणे, वासाची जाणीव न होणे आणि गळ्याच्या हाडाच्या वरील भागात कफामुळे होणारे विकार यामध्येही शिरोविरेचन नस्याचा उपयोग होतो.
- स्नेहण (बृहण) नस्य हे मान, खांदा आणि छाती या भागातील मांसपेशीचे बल वाढविण्यासाठी उपयोगात येते. तसेच डोक्याला हलकेपणा, वातामुळे होणारे अकाली रोग जसे, अकाली केस पांढरे होणे, अकाली दात पडणे, डोक्याचे व दाढीचे केस गळणे, कान दुखणे, कानामध्ये आवाज येणे, आवाज फुटणे, तोंड कोरडे पडणे, केस पांढरे होणे, चेहऱ्यावर अकाळी सुरकुत्या पडणे, व मोतीबिंदू या विकारामध्ये स्नेहण नस्याचा उपयोग होतो.
प्रकार : (1)मर्श नस्य, (2) प्रतिमर्श, (3) अवपीड (4) विरेचन
यापैकी पहिले दोन हे स्नेह नस्याचे प्रकार आहेत.

Table of Contents
नस्य करण्याचे फायदे काय आहेत ?
नस्याच्या नियमित वापरामुळे मिळणारे फायदे :
- शिर व इन्द्रियांच्या ठिकाणील वाताचे शमन होते व वाढलेल्या कफाचे शोधन होते.
- उर्ध्वजत्रुगत सर्व इन्द्रिय आणि अवयवांचे बल व कार्यक्षमता वाढते.
- मेंदूवरचा ताण कमी करुन त्यास पोषण मिळते.
- मान व खांद्यांच्या स्नायुंना दृढ बनवते.
- आवाज सुधारणे, गळ्याचे आजार.
- चेहर्याचा वर्ण व कांति सुधारते.
- पॅरालिसीस, स्ट्रोक, ब्रेन प्रॉब्लेम्स
- रात्री झोपेत घोरणे.
- पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी यावर उपयुक्त
- अस्पष्ट अथवा अडखळत बोलणे, कोणत्याही प्रकारच्या गाठी यावर उपयुक्त
- स्ट्रैस, टेंशन, मानसिक आघात.
- चेहऱ्यावरील डाग, व्यंग आणि सुरकुत्या कमी करते.
- मुखाचे (दात, हिरड्या, जीभ ,घसा) आरोग्य टिकवून ठेवते.
- केसांचि मुळं बळकट करुन केस गळणे,तुटणे,अकाली पिकणे कमी होते.
- वारंवार होणारी सर्दि, सायनस चा त्रास व त्यामुळे होणारी डोकेदुखी व चिडचिड कायमची दूर करते.
- जिभेला चव नसणे, अर्धशिशी, आकडी येणे, वासाची जाणीव न होणे आणि गळ्याच्या हाडाच्या वरील भागात कफामुळे होणारे विकार
नस्य कधी करावे?
सकाळी उठल्यावर, संध्याकाळी, भोजन झाल्यावर, मलमूत्र त्याग केल्यावर, डोक्याला तेलमालीश केल्यानंतर, दात घासल्यावर, व्यायाम केल्यानंतर, रात्री झोपताना अश्या वेळी नस्य करावे.
वयाची मर्यादा?
वय वर्ष ७ ते ८० वर्षापर्यंत नस्य करता येते.
नस्य केव्हा करू नये?
पावसाळ्यात (मध्य जानेवारी ते मध्य मार्च) किंवा उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये. अन्न, आंघोळ, शारीरिक संबंध, अल्कोहोल ई. क्रिया नंतर आणि गर्भधारणेदरम्यान व मासिक पाळी दरम्यान (1-3 दिवस) नस्य करू नये.
किती प्रमाणात द्यावे ?
दोन थेंब प्रत्येक नाकपुडीत टाकावे.
जी व्यक्ती रोज तेलाचे नस्य करते त्यांचा उर:भाग (छाती), चेहरा प्रसन्न व निरोगी राहतो. ज्ञानेंद्रिय चांगल्या प्रकारे कार्य करतात. कफविकार होत नाहीत, दृष्टी चांगली राहते, केस काळे राहतात, केस दृढ होतात.
नस्यमध्ये कोणते तेल वापरावे ?
नस्य करिता तीळ तेल अथवा शुद्ध गाईचे तूप हे वापरावे. अणु तेल नस्याकरिता उत्तम सांगितले आहे. नस्य कर्म करण्यासाठी रोगानुसार औषधी तेल, औषधी तूप, विविध औषधाचे काढे, चूर्ण, ताज्या वनस्पतीचा रस, यांचा आवश्यकतेनुसार उपयोग वैद्य करतात.

नस्य कसे कार्य करते ?
“नस्य” हा शब्द नाकाशी संबंधित आहे. नाकामद्धे सोडलेले औषध डोक्यातून आपल्या चेतना संस्थेवर काम करते. नस्य हे चेतनेचे द्वार आहे, नाकाद्वारे प्रविष्ट औषधे मन, प्राण वायु, तर्पक कफ, साधक पित्त, आणि मज्जाधातू वर प्रभावी काम करते.
नस्य थेरपी ही एक आयुर्वेदिक प्रक्रिया आहे जी अतिरीक्त श्लेष्मा काढून टाकून वरच्या श्वसनमार्गास स्वच्छ करण्यात मदत करू शकते. डोक्याचे द्वार आणि उपचारामध्ये औषधी तेल, तूप, पावडर, कच्च्या औषधी वनस्पतींचे रस (ब्राह्मी), मध, दूध, क्षार, पाणी इत्यादींचा समावेश आहे.
नस्य चिकित्सेचे आलेले काही अनुभव :-
- एका ३२ वर्षांच्या पेशंटला तीव्र डोकेदुखीचा त्रास होता…….इतका की डोळे उघडणेही कठीण झाले होते.
आवाज, प्रकाश — सगळं त्रासदायक वाटत होतं.
ती खूप घाबरलेली होती आणि पटकन आराम हवा होता.
आयुर्वेदानुसार तिची प्रकृती आणि लक्षणे पाहून तिला सुतशेखर रस या औषधाचे प्रधमन नस्य केले , काही मिनिटांतच तिला डोकं हलकं वाटायला सुरुवात झाली…नाकातील जडपणा कमी झाला…आणि हळूहळू तीव्र वेदना शांत होऊ लागल्या.
तिच्या चेहऱ्यावरचा तो आराम आणि समाधान खूप खास होतं.
कधी कधी योग्य वेळी योग्य आयुर्वेदिक उपचार शरीराला आश्चर्यकारक प्रतिसाद देतात.
- २० वर्षांचा एक मुलगाअनेक वर्षांपासून सतत नाक बंद होण्याचा त्रास.श्वास घेण्यास अडचण, झोप नीट नाही, सतत जडपणा… इतकंच नाही तर DNS साठी ऑपरेशनसुद्धा झाले होते…पण तरीही अपेक्षित आराम मिळाला नव्हता.आयुर्वेदानुसार त्याची प्रकृती आणि तक्रारी समजून घेतल्या आणि आम्ही नासाधावन व नस्य उपचार सुरू केले.(मोरचूद व त्रिफळा सिद्ध जल व क्षार तेल ) उपचारानंतर हळूहळू बदल जाणवू लागला…नाक मोकळं वाटू लागलं, श्वास घेणं सोपं झालं, झोप शांत लागली आणि अनेक वर्षांचा त्रास कमी होऊ लागला.
- ४० वर्षांची एक महिला…व्यवसायाने योग शिक्षिका.पण तीव्र cervical pain मुळे मान हलवणंसुद्धा कठीण झालं होतं.वेदना इतक्या वाढल्या की त्यांना स्वतःचे yoga sessions घेणंही अवघड झालं…सतत stiffness, जडपणा आणि त्रास.आयुर्वेदानुसार तिची प्रकृती आणि लक्षणे समजूनआम्ही नस्य उपचार सुरू केले.काही दिवसांतच —मान हलकी वाटू लागली, वेदना कमी झाल्या, आणि पुन्हा आत्मविश्वासाने त्या yoga शिकवू लागल्या.
कधी कधी शरीराला फक्त योग्य दिशा आणि योग्य उपचारांची गरज असते. प्रत्येक रुग्णाची प्रकृती वेगळी असते. उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.
आजकाल अनेक लोक सततचा ताण, anxiety, overthinking आणि शांत झोप न लागण्याने त्रस्त आहेत…
मन सतत चालूच असतं…रात्री शरीर थकलं तरी डोकं शांत होत नाही. अशा काही पेशंट्समध्ये योग्य प्रकारे केलेले नस्य उपचार खूप चांगला प्रतिसाद देताना दिसतात.
काही दिवसांतच —
- मन हलकं वाटणं
- शांत झोप लागणं
- डोक्यातील जडपणा कमी होणं
- सततचे विचार कमी होणं
असे बदल जाणवू लागतात. फक्त याच नाही…
तर अशा अनेक रुग्णांमध्ये नस्य उपचारांमुळे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
- केस गळणे
- नाकातून रक्त येणे — एक emergency परिस्थिती
- वंध्यत्वासाठी सहाय्यक उपचार म्हणून
- डोळ्यांच्या तक्रारींमध्ये
- Covid च्या वास न येणाऱ्या रुग्णांमध्येही
योग्य प्रकारे केलेल्या नस्यामुळे अनेकांना आराम जाणवला.
आयुर्वेदात नस्य हे फक्त नाकापुरते मर्यादित नाही, तर शिरोप्रदेशाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे उपचार मानले गेले आहेत.
प्रत्येक रुग्णाची प्रकृती, कारणे आणि उपचार वेगळे असतात.
म्हणूनच योग्य सल्ला आणि योग्य पद्धत महत्त्वाची आहे.
आयुर्वेदात नस्य हे फक्त नाकासाठी नाही, तर मन आणि मस्तिष्क शांत करण्यासाठीही महत्त्वाचे मानले जाते. कधी कधी शरीराला औषधांपेक्षा शांततेची गरज असते.
नस्याचे हे २ थेंब आपल्यासाठी आरोग्याचे, सहज करण्याजोगे, सोपे, स्वस्त व बहूगुणकारी असे आयुर्वेदाच्या खजिन्यातले वरदान आहे. आपण सर्वांनी ह्याचा उपयोग करावा व आपले आरोग्य वाढवावे.
नस्यचिकित्सा स्वास्थ्य रक्षणार्थ सांगितलेल्या उपायांपैकी एक असल्याने दिनचर्येत नक्की याचा समावेश करा !
Written By…
|
Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. Contact today to book an appointment. |




