Table of Contents

उपवास – एक गुणकारी आहाराचे शास्त्र

भारतीय संस्कृति आणि येथील विभिन्न धर्मसंप्रदायामध्ये उपवासाचे विशेष महत्व आहे.आपल्या प्रत्येकाच्या घरात उपवास करणारी एकतरी व्यक्ती असतेच. आई, आजी अथवा मावशी उपवास करणारी असल्यास घरातील इतर व्यक्ती त्यांचे अनुकरण करून उपवास सुरु करतात. बहुतेक वेळेला आठवड्याचा एक वार हा उपवासाचा असतो. अनेक वेळेला उपवास का करावा व त्याचे महत्व काय ह्याबाबत शास्त्रीय माहिती अनेक जणांना नसते. घरातील इतर व्यक्ती करतात म्हणून मी ही करतो असे उत्तर ऐकायला मिळते.

आजकाल सर्व जण डाएटिंगच्या नावाखाली अनेक विचित्र आहाराचे प्रयोग करतांना दिसतात. परंतु आयुर्वेदशास्त्र ह्याबाबतीत अत्यंत स्पष्ट अशा सूचना देते. म्हणूनच ह्यालेखात आपण उपवास व त्याबद्दलची शास्त्रीय ओळख, आयुर्वेदशास्त्राच्या आधाराने करून घेणार आहोत.

उपवास का करावा?

उपवास ही केवळ डाएटिंग कीवा धर्माच्या नावावर केले जाणारे नसून याचे आरोग्याच्या दृष्टीने अधिक महत्व आहे. कारण उपवासामुळे अग्निप्रदीप्त होऊन आरोग्य टिकून राहते. परंतु अयोग्य पद्धतीने केलेल्या उपवास जसे की “एकादशी आणि दुप्पट खाशी” असे केल्यास याने शरीराला त्रास च होणार आहे.

उपवास = उप + वास

उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे कीवा असणे. केवळ काही विशिष्ट पदार्थ खाणे म्हणजे उपवास नव्हे, तर आपल्या ज्ञानेंद्रिया च्या, कर्मेद्रीयाच्या आणि उभयात्मक मनाच्या जवळ जाणे म्हणजे उपवास करणे. आपले लक्ष म्हणजेच आपला वास, म्हणजे consciousness, आपले मन एकाग्र करणे, आपली सद-सद विवेक बुद्धी वापरणे हा खरा उपवास होय.

संपूर्ण दिवस ध्यानस्थ बसणे आणि त्या ध्यान अवस्थेत इतके मग्न होऊन जाणे की भूक, तहान किंवा इतर कोणत्याही भौतिक गोष्टीकडे लक्ष न राहणे म्हणजे उपवास. मानवी शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे.

साधना अशी असावी की, जेव्हा तुमचे शरीर विसरून तुम्ही तुमच्या आतल्या शरीराला (सूक्ष्म) म्हणजे आत्म्याकडे जाता त्यावेळी तुम्हाला त्या भौतिक शरीराची काहीच गरज नसते. अश्या वेळी शरीर आपोआपच आपले काम करत असते.

जसे की, महावीर स्वामींप्रमाणे प्रमाणे ४ -६ महीने कोणी अन्न ग्रहण न करता राहू शकते का ? कारण उपवासचा अर्थ काय खावे आणि काय खाऊ नये असा नसून, एखादी व्यक्ति आपल्या आत्म्या मध्ये आपल्या स्वतःमध्ये लीन होणे असा आहे, जेणेकरून त्याला इतर कोणत्याही गोष्टीचे भान राहणार नाही. जर शरीराबद्दल च त्याला काही भान राहणार नाही आणि तो पूर्णता आत्म्या मध्ये एकरूप झाला तर, जेवणाचे भान कसे राहील.

उपवास व लंघन ह्यात फरक आहे का?

उपवास हा लंघनाच्या दहा प्रकारापैकी एक आहे.

लंघन म्हणजे लघुता (हलकेपणा), शरीरामद्धे लाघवता निर्माण करणे. उपवास म्हणजेच वासापासून दूर राहणे. आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धती मध्ये आहार आणि विहाराला खूप महत्व आहे.

बदलती जीवनशैली आपल्या चुकीच्या खण्यापिण्याच्या सवयीमुळे शरीर यंत्रणा बिघडते, ती दुरुस्त करण्यासाठी शरीर स्वतःहून प्रयत्न करत असते. या प्रयत्ंनातील महत्वाचा भाग म्हणजे शरीरातील अनावश्यक साठलेले पदार्थ बाहेर टाकणे. हीच विषारी द्रव्ये अनेक आजारांचे मुळ आहे. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी विश्रांती व लंघन ह्या प्रक्रियांचा वापर केला जातो.

उपवासाचे प्रकार कोणते व प्रत्येक प्रकाराचे गुण अथवा अवगुण कृपया सांगावेत?

उपवास हा केवळ शारीरिक नसून कायिक, वाचिक आणि मानसिक अश्या प्रकारे ही केला जातो.

कायिक उपवास म्हणजे शरीराने कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे. वाचिक म्हणजे मौन धरण करणे अथवा आपल्या बोलण्यातून कोणालाही न दुखावणे. आणि मानसिक म्हणजे मनाची चंचलता कमी करून मन एकाग्र करणे, प्रत्येकाला मदत करणे, मनामद्धे देखील सात्विक भाव निर्माण करणे. राग, ईर्ष्या, द्वेष, लोभ इ. रागा पासून अलिप्त राहणे.

आयुर्वेदामद्धे शारीरिक चिकीत्सेकरिता षट्कर्मे (सहा कर्मे)सांगितलेली आहेत.

या षट्कर्मामद्धे लंघन प्रथम कर्म सांगितले आहे.

“ लंघन: यत्किंचित लाघव कर देहे तल्लघन स्मृतम” |

शरीरामद्धे लाघवता उत्पन्न करणाऱ्या क्रियेला / द्रव्याला लंघन असे म्हणतात.

उपवास हा पुण्यप्रद, आमाचे पचन करणारा, स्फूर्ति प्रदान करणारा आणि इंद्रिय प्रसादक आहे. आरोग्य टिकविण्याच्या दृष्टीने उपवासला विशेष महत्व आहे. वारी उपवास प्रकारात निराहार उपवास श्रेष्ट आहे. परंतु आजच्या धावपळीच्या काळात फलाहार घेऊन उपवास करावा.

उपवास केल्यास किती वाजता सोडावा?

उपवास केल्यास तो नेहमी संध्याकाळी सूर्य मावळण्याआधी अन्न ग्रहण करावे. या नियमाचे दररोज ही पालन करावे. आयुर्वेदात सुर्यास्तापूर्वी जेवण घेणे केव्हाही चांगले. म्हणजे साधारण संध्याकाळी ७ वाजण्याआधी रात्रीचे जेवण घ्यावे.

आपल्या घरातील आजी आजोबा ही नेहमीच रात्रीचे जेवण लवकर घ्या असे सांगतात मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हे दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

सुर्यास्ता नंतर पोटातील अग्नि शमन पावतो आणि पंचनाची क्रिया मंदावते. त्यामुळे उशिरा खाल्ले गेलेले अन्न पंचले नाही तर आपण इतर व्याधीना निमंत्रण देतो. यामुळे वजन वाढणे, मलावष्टम्भ, जास्त चरबी वाढणे, अम्लपित्त, अश्या आजाराना आपण निमंत्रण देतो.

उपवासामध्ये काय ग्रहण करावे अथवा करू नये?

प्रत्येक व्यक्तीच्या वय, प्रकृती, बल , व्याधी यानुसार, तसेच ऋतुनुसार आणि प्रांतानुसार उपवासाचे पदार्थ घ्यावे. जसे की, दक्षिणेकडे रोज भात, आणि अंबवलेले पदार्थाचे सेवन होते त्यांनी उपवास केल्यास त्यांना उपवासला पोळी (गव्हाची पोळी) चालते हेच महाराष्ट्रामद्धे किवा गुजरात सारख्या प्रदेशात फलाहार करावा. म्हणजे फळांचे सेवन किवा दूध घेणे सुक्यामेव्याचे सेवन करणे.

काय खाऊ नये ?

आजकाल च्या ट्रेंड नुसार जसे साबूदाणा वडा किवा खिचडी, चिप्स, भरपूर प्रमाणात शेंगदाणे, बटाटा किवा त्याचे चमचमीत वेफर्स तसेच केळीचे तिखट चमचमीत वेफर्स खाऊ नयेत.

काय खावे ?

राजगिरा, रताळे, राजगिरा लाह्या, दूध, सर्व प्रकारची फळे (डाळिंब अंजीर, वेलची केळ अथवा केळी) , लाल भोपळा ,सुका मेवा अथवा भिजवून घेतलेले (बदाम, अंजीर, अक्रोड, खजूर, काळ्या मनुका) , वरई अमसुल सार असा आहार घ्यावा जेणेकरून पित्त वाढणार नाही.

ऋतूंनुसार उपवासाच्या पदार्थांमध्ये बदल करावेत का?

नक्कीच, आपल्या भारतीय संस्कृतीत आणि आयुर्वेदात ऋतुनुसार आहार घेण्याचे वर्णन आहे यामुळे आपले आरोग्य स्वस्थ ठेवण्यास आणि अन्नपचंन होण्यास मदत होते.

आयुर्वेदात ऋतु आणि आहार यांचे खूप सुंदर वर्णन केले आहे आणि त्यानुसार आहार घेतल्यास आपण व्याधीना होण्यापासून रोखू शकतो.

 

आहार ऋतु उदा.
स्निग्ध आहार ग्रीष्म, वर्षा, शिशिर व हेमंत तूप, दूध, गुळाची पोळी.
रुक्ष आहार शरद व वसंत यव, गोधुम, मूग, हुलगे.
शीत आहार ग्रीष्म व शरद नारळ, तूप, कोशिंबीर, आमसूल.
उष्ण आहार वर्षा, वसंत, हेमंत व शिशिर जुने धान्य, फळभाज्या,मूग,सुंठ

 

उपवासाच्या दिवशी कांदा व लसूण ग्रहण करू नये, हे खरं आहे का?

याचे कारण आपण वर पाहिल्याप्रमाणे उपवासचा अर्थ म्हणजे आपल्या आत्म्या जवळ राहणे म्हणजे शरीराचे कोणत्याही प्रकारचे वास अनुभव न करणे.

आयुर्वेदानुसार सत्व, रज आणि तम असे तीन गुण असतात. त्यातील रज आणि तम गुण ही स्थितिदर्शक आहेत म्हणजे ह्या गुणांची व्यक्ति आहे त्या स्थितीच राहते. तम म्हणजे अंधकार अज्ञानाचा अंधार, रंग, चिडचिड, मानसिक नैराश्य, कोणतेही काम न करण्याची भावना.

आयुर्वेद शास्त्रानुसार कांदा आणि लसूण या दोन्ही गोष्टी रजोगुणात्मक व तमोगुणात्मक म्हणजे शरीरामद्धे आणि मनामध्ये राजसीक आणि तामसिक गुणांची वृद्धी करतात असे वर्णन केले आहे.

हिंदू संस्कृतीनुसार श्रवण मास, चातुर्मास अश्या वेळी कांदा-लसूण यांचे सेवन वर्ज्य सांगितले आहे कारण कांदा आणि लसूण याने वाढणाऱ्या तम गुणामुळे ध्यान / साधना दरम्यान मन एकाग्र होत नाही.

साधना उत्तम होण्याकरिता सत्व गुणाची वृद्धी होणे महत्वाचे आहे आणि त्याकरिता नेहमी सात्विक अन्नाचे सेवन करावे असे आयुर्वेदात सांगितले आहे.

आहारामध्ये कांदा व लसूण याचे काही प्रमाणात सेवन केल्यास त्याचे आरोग्याकरीत फायदे ही सांगितले आहेत परंतु त्याचे प्रमाण आणि निर्माण पद्धती यानुसार ते सेवन केले पाहिजे.

उपवासाला बेकरीतील पदार्थांचे सेवन चालते का?

नाही, उपवासच काय तर इतर वेळी सुद्धा बेकरीचे पदार्थ खाणे टाळावे.

बेकरीचे पदार्थ बनविताना वापरलेल्या यीस्ट प्रकारामुळे शरीरामद्धे कृमि म्हणजेच जंत होण्याचे प्रमाण वाढते. तसेच यामध्ये वापरत असलेल्या मैदयामुळे पंचनाच्या तक्रारी वाढून मलावष्टम्भ, मूळव्याध, अपचन, गसेस होणे, अम्लपित्त अश्या तक्रारी वाढतात.

उपवास आठवडयातून किती वेळा करावा?

उत्तम आरोग्याकरिता आठवड्यातून एक वेळा उपवास करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्ति उपवास करू शकत नाही त्यांनी किमान लघु भोजन अल्प मात्रेत घ्यावे.

उपवास कोणी करू नये?

  • आयुर्वेदानुसार लहान मुले
  • वृद्ध व्यक्ति
  • कमी बल असलेल्या स्त्रिया / पुरुष
  • गर्भिणी (गरोदर स्त्रिया)
  • व्याधी ग्रस्त रुग्ण (आजारी व्यक्ति) अथवा नुकतेच आजारातून बाहेर पडलेले व्यक्ति
  • सूतिका (बाळाला दूध पाजणारी आई)

उपवास कसा सोडावा?

  • उपवास नेहमी सूर्यास्तपूर्वी सोडावा जेणेकरून अन्नाचे पचन व्यवस्थित होईल.
  • एकाच वेळी अधिक अन्न खाऊ नये, जेणेकरून अपचन होणार नाही.
  • उपवास सोडताना नेहमी हलके, पौष्टिक आणि सात्विक अन्न जसे, गव्हाची पोळी / फुलका तेल अथवा तूप लावून, एखादी फळभाजी, मुग डाळीचे कढण असे अन्न घ्यावे.
  • रजोगुणी आणि तामसीक पदार्थ खाणे पुर्णपणे टाळावे.
    उपवास सोडण्यापूर्वी भात घ्यावा आणि नंतर पोळी भाजी असे समीकरण सर्वत्र दिसते, यामागील उद्देश हा भात पचण्यास हलका अश्या अर्थाने घेतला जात असावा. परंतु आयुर्वेदानुसार भात हा शिजण्यास पाणी अधिक लागते म्हणजे तो पाण्यातच तयार होत असल्याने कफ वाढविणारा असे म्हणले जाते, यामुळे पोटातील अग्नि ही मंदावतो म्हणून उपवास सोडताना नेहमी पहिले एक घास पोळीचा घ्यावा आणि नंतर भात घ्यावा जेणेकरून पोटातील अग्नि प्रदीप्त होऊन अन्नाचे पचन होईल.

उपवासाचे दुष्परिणाम आहेत का?

अयोग्य प्रकारे किवा सध्या फॅड असलेल्या intermittent fastingच्या नावाखाली आपण अनेक प्रकारचे पदार्थ खातो जे आपल्याला पंचत नाहीत उलट शरीरात पित्ताची वृद्धी करतात. काही वेळ आपण खूप काळ विनाकारण उपाशी राहतो या fasting च्या नावाखाली चहा व कॉफी सारखी उत्तेजक पेये घेतो.
आयुर्वेदामध्ये १३ अधारणीय वेगांचे वर्णन आले आहे. अधारणीय म्हणजे ज्याचे धारण करू नये / ते रोखू नये. ज्यांचे धारण केल्यास शरीरामद्धे अनेक व्याधी उत्पन्न होऊ शकतात. त्यातील एक वेग म्हणजे क्षुधा (भूक).

कार्श्य दौर्बल्य वैवर्ण्य अंगमर्द अरुचि भ्रम: |
क्षुत वेगनिग्रहात तत्र स्ंनिग्धोष्ंनं लघु भोजनम || ——अ. हृ.

क्षुधा (भूक) या शारीरिक वेगाचे धारण केल्यास अंगदुखी, तोंडाला चव नसणे, सतत झापड येणे, वजन कमी होणे, चक्कर येणे, थकवा,अंग गळून गेल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसून येतात.

एखाद्या व्यक्तीस उपवास बाधू शकतो का?

अयोग्य रित्या आणि अयोग्य व्यक्तीने केल्यास नक्कीच उपवासचा त्रास जाणवू शकतो. उदा. पित्त प्रकृतीच्या व्यक्तिना उपवास केला आणि त्यादिवशी साबूदाणा, शेंगदाणे, बटाटा, त्याचे वेफर्स, चहा / कॉफी असे पदार्थाचे सेवन केल्यास नक्कीच आणखी पित्तवृद्धी होऊन रक्त दुष्टि सुद्धा होते. व अंगावर पित्त अथवा त्याच्या गांधी उठणे, छातीत घशात पोटात जळजळ होणे, अन्न घशाशी येणे, मळमळणे, तोंडला कडवट चव येणे. अश्या तक्रारी निर्माण होतात.

म्हणून “एकादशी आणि दुप्पट खाशी” असे न करता सात्विक आणि पथ्यकर आहाराचे सेवन करावे. जेणेकरून केलेल्या उपवासाचे फायदे जाणवतील आणि शरीरामधे हलकेपणा निर्माण होईल.

उपवास सुरु केल्यानंतर किती दिवसात कोणते फरक पडतात?

उपवास (लंघन) केल्यास काही व्याधी मध्ये म्हणजे उदा. ताप यामध्ये लगेच एका दिवसात आपल्याला फरक दिसून येतो. तसेच अजीर्ण, अपचन, मळमळणे, अॅसिडिटी या सारख्या आजारात लंघनाने लगेच फरक दिसून येतो.

काही इतर जीर्ण व्याधी साठी काही ठराविक काळ जाऊ द्यावा लागतो जसे की,७ किवा १५ दिवस किवा १-३ महीने. जसे की, स्थौल्य (वजन वाढणे), शरीरमध्ये अतिरिक्त चरबी वाढणे, अल्सर.

उपवासाने अनेक फरक पडल्याचे आपण अनुभवू शकतो ते असे की,

  • शरीर हलके जाणवणे
  • अन्न पचन सुलभ होते
  • वजन कमी होणे
  • शरीरातील रक्ताभिसरण वाढणे
  • पित्त कमी होणे / त्रिदोष नियंत्रित ठेवणे
  • उत्साही वाटणे
  • मेंदू अधिक कार्यान्वित होणे.
  • रक्तशुद्धी होणे.
  • मनाची चंचलता कमी होणे / मन एकाग्र करण्यास मदत होते

उपवासाने वजन कमी होण्यास मदत होते का?

आयुर्वेदानुसार सांगितले आहे, हिताशिस्यात (हितकर आहाराचे), मिताशिस्यात (कमी प्रमाणात / योग्य प्रमाणात) आणि कालभोजिस्यात (योग्य वेळेत) खा. साधारण ८ तासाचा काळ दोन जेवणामद्धे जाऊ द्या. अश्या प्रकारे कोणी उपवास करत असेल सात्विक, लघु, ताजे आणि पथ्यकर अन्न घेत असालतर नक्कीच पोटातील अग्नि वाढून अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि शरीरामद्धे आणि पोटामध्ये अतिरिक्त चरबी वाढत नाही आणि वजन कमी होण्यास शरीरामद्धे हलके पणा निर्माण होतो.

उपवासाने पचनशक्ती सुधारते का?

अपथ्याकर अन्न, अध्यशन (अति प्रमानात खाणे), विषमाशन (खाण्याच्या वेळा न पाळणे), अजीर्णशन (आधी घेतलेलं अन्न पचन न होताच दुसरे अन्न ग्रहण करणे) असे घेतल्यास अग्नि मंदावतो आणि अन्नाचे पचन नीट न होता शरीरात आमदोष वाढू लागतो. याच उलट आपणास जर आपचंनाच्या तक्रारी असतीला आणि उपवास केला तर शरीर शुद्धीकरणाचे काम करून सर्व साठलेला आम शरीराच्या बाहेर टाकतो आणि अग्नि पूर्ववत होतो आणि पचन शक्ति सुधारते.

दोष अथवा व्याधी संपल्यानंतर सुद्धा उपवास करावा का?

आपल्या वय, प्रकृती, बल आणि व्याधींनुसार अथवा आपल्या वैद्यांच्या सल्यानेच व्याधी संपल्यावर उपवास करावा. कारण अपथ्यकर अन्न खाल्याने शरीरातील त्रिदोष (वात, पित्त, कफ) बिघडतात त्रिदोष प्रकुपित होणे हेच सर्व रोगांचे मूल कारण आहे.

“रोगा सर्वेपि मंदाग्नो”||

सर्व रोगांचे मूल कारण हे अग्नि (जठराग्नि) आहे असे आयुर्वेद सांगते. अग्नि चांगला ठेवण्यासाठी आपण योग्य, हलका, सात्विक आणि मुबलक आहार घेणे जरुरीचे आहे.
उपवास / लंघन केल्याने प्राकृत अग्नि सुधारतो आणि व्याधी सम्पुष्टात येण्यास मदत होते. पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि रोगांपसून बचाव करण्यासाठी महिन्यातून एकदा तरी लंघन करावे.

कारण उपवास / लंघन केल्याने शरीराचीच नव्हे तर मनाची देखील शुद्धी होण्यास मदत होते.

नोकरी व व्यवसाय करणाऱ्यानी कार्यालयात उपवास करावा का?

प्रत्येक व्यक्तिनि आपली प्रकृती, वय, बल, काल, आणि सातम्य यांचा विचार करून उपवास करावा.

आपण नोकरी करत असाल आणि अश्या वेळी उपवास करायचं असल्यास आपण वर पाहिलेल्या उपवासच्या प्रकारापैकी फलाहार उपवास करावा. आपल्याला आमाजीर्ण, अजीर्ण किवा ताप असेल तर अश्या अवस्थेत आपण नोकरी करत असताना सुद्धा पथ्यकर अन्नाचे सेवन करून उपवास (लंघन) करू शकता याने शरीरात वाढलेले दोष कमी होण्यास मदत होते.

उपवासाचा स्त्रियांच्या मासिक पाळीवर योग्य अथवा अयोग्य परिणाम होतो का?

उपवास म्हणजे हलका आणि सात्विक आहार घेणे आणि मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी अश्याच प्रकारचा आहार घ्यावा असे आयुर्वेद शास्त्र सांगते.

आयुर्वेदानुसार मासिक पाळीच्या वेळी म्हणजे रजस्त्राव वेळी काही महत्वपूर्ण गोष्टींचे पालन करण्यास संगितले आहे ज्याला “रजस्वला परिचर्या” असे म्हणतात. यामध्ये मासिक स्त्रावादरम्यान स्त्रीने काय आहार घ्यावा, काय करू नये आणि काय करावे कोणत्या प्रकारचे आचरण असावे याबद्दल सांगितले आहे.

या काळात देखील अग्नि मंद असल्याने तिखट, तेलकट, आंबट, जड अन्न पदार्थ, शिळे खाऊ नये असे वर्णन आले आहे. या काळात रुक्ष आहार, सात्विक आणि हलके अन्न घ्यावे असे संगितले आहे.

गरोदर स्त्रीने उपवास करावा का?

नाही.यावेळी गर्भाची (बाळाची) पूर्ण वाढ ही आईने घेतलेल्या आहारावर अवलंबून असते. बाळाचे संपूर्ण पोषण हे आईच्या आहारवर च अवलंबून असते. याकरिता आईने (गर्भिणी) ने संपूर्ण आहार घेणे महत्वाचे असते. उपवास करू नये. परंतु काही अजीर्णचा त्रास जाणवलं तर लघु (हलका) आहार घेतल्यास चालते परंतु उपाशी राहू नये.

कोणत्या आजारात उपवास कधीही करू नये?

क्षय , राजयक्ष्मा , लहान मुलांचे आजार, गर्भावस्थेत, दौर्बल्य, चक्कर येणे,कमी रक्तदाब,अतिकृश व्यक्ति यांनी उपवास करू नये.

कोणत्या आजारात उपवास जरूर करावा?

आचार्य चरकाचार्यांानी शिशिर ऋतु मध्ये काही व्याधींकरिता लंघन देण्यास संगितले आहे.

त्वकदोषीना प्रमीढाना स्निग्धाभिष्यन्दि बृहिनाम |
शिशिरे लंघनाम शस्तमपि वातविकारीनाम || चरक सू. २२/२४

 

आचार्य चरक आचार्य वाग्भट
त्वचा विकार ज्वर, प्रमेह, आमदोष
प्रमेह / मधुमेह उरूस्तंभ, अतिस्निग्ध
ज्वर / ताप कुष्ट, विसर्प,
आमदोष प्लीहा, विद्रधि
वात व्याधी कंठ रोग, नेत्ररोग
बृहण केलेले अतिस्थूल

आचार्य वाग्भटानी खलील व्याधी मध्ये निर्जल उपवास करावा असे संगितले आहे.

  • कफ-पित्त जन्य व्याधी
  • वमन , उद्गार (उलटी होणे , ढेकर येणे )
  • अतिसार (जुलाब होणे)
  • हृद्रोग, हृल्लास (हृदयाचे आजार, मळमळणे )
  • विसुचिका ,अलसक (कॉलरा , अल्सर )
  • विबंध, गौरव(मलावष्टम्भ ,जडता )

उपवासावर श्रद्धा अथवा विश्वास नसेल तरीही उपयोग होतो का?

उपवास हा कायिक, वाचिक आणि मानसिक अश्या तीन प्रकारे केला जातो. भारतीय संस्कृतीत उपवासाला धार्मिक रित्या महत्व दिले गेले असले तरी त्यामागे शास्त्रीय दृष्टीकोण ही सांगितलं आहे.

उपवासणे फक्त देवपूजा, यज्ञ-याग, किवा ध्यान साधना च घडते असे नसून शरीराची आणि मनाची जडण-घडण देखील होते. उपवास शरीर आणि मन शुद्धीकरणाची एक प्रक्रियाच होय.

उपवास व एकादशी ह्यांचा शास्त्रीय दृष्टीने संबंध आहे, का हि एक अंधश्रद्धा आहे?

हिंदू पंचागाप्रमाणे कृष्ण आणि शुक्ल पक्षामद्धे अश्या प्रत्येकी एक अश्या दोन एकादश्या येतात.

या एकादशीला उपवास करण्याची परंपरा आहे ज्याचे दोन भेद आहेत. स्मार्त (स्मृतींना मानणारे आणि भागवत (भागवत धर्म पाळणारे).आषाढ ,श्रावण, भाद्रपद, अश्विन या चार महिन्यात पावसाळा असतो. याच वेळी श्रावण महिना, चातुर्मास, एकादशी आढळून येते. आपण जर पहिले तर हा पावसाळ्याचा ऋतु असल्याने या वेळी पोटातील अग्नि हा मंद असतो आणि अश्यामुळे जड अन्न, जास्त अन्न खाणे योग्य नाही. म्हणून या काळात उपवासांची योजना केलेली दिसते.

श्री ज्ञानेश्वर माऊलीनी भागवत धर्माची पुनस्थापना केली. सर्वसामान्यांनी एकत्र येऊन कोणताही भेदभाव न ठेवता परमेश्वराची उपासना करावी हाच यामागे उद्देश. याच एकादशीला उपवास (उप+वास) ठेवल्यास परमेश्वर आणि स्व (आपण) एकरूप आहोत याची भावना निर्माण करण्यासाठी वारकरी संप्रदायात एकादशी चा उपवास केला जातो.

पोटरिकामे (हलके) असणे आणि त्यामुळे आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी न जाणवणे हाच यामागील उद्देश. ध्यान- धारणा करण्यासाठी मनाची एकाग्रता खूप महत्वाची आहे. हलके, पथ्यकर आणि सात्विक अन्न खाल्यास ते पचण्यासही सुलभ असते याच उलट जड अन्न, मांसाहार, किवा तामसीक अन्न पदार्थ खाल्यास पोटात आणि संपूर्ण शरीरात जडपणा, आळस, अतीनिद्रा, पोटात दुखणे, मलावष्टम्भ किवा जळजळ असे झाल्यास आपले ध्यानात काय रोजच्या कामात देखील लक्षं लागत नाही,अहो मग परमेश्वरच्या नाम स्मरणात कसे लागेल?यासाठी आपले आपल्या जीभ, पोट आणि इंद्रिये यांवर ताबा हवा. म्हणूनच हलका आणि बेताचा आहार घेणे आणि आपल्यातील स्व निर्माण करून इंद्रियांना आपल्या ताब्यात करून परमेश्वरमद्धे किवा स्वतमध्ये लीन होणे म्हणजे एकादशी उपवास.

पावसात भिजलात तर ताप, सर्दी, खोकला होणारच आणि भिजल्यावर चमचमीत भजी, वडापाव खाललात तर नक्कीच आजारी पडणार आजकालच्या या कोरोंना काळात तर आणखीन च काळजी घेणे महत्वाचे आहे आणि म्हणूनच पाचेल तसे आणि तितकेच अन्न खाणे या योजनेने एकादशी, चातुर्मास आणि श्रावण महिन्यात येणार्याे उपवसांचे महत्व आहे. उपवास करण्यासाठी दिवस महत्वाचा नसून त्यादिवशी आयुर्वेदीय शास्त्र नित्य पाळणे महत्वाचे आहे. परंतु एखादा दिवस ठरवायचा असल्यास महाशिवरात्री, श्रावणी सोमवार, वटपौर्णिमा, संकष्ट चतुर्थी, नवरात्र अथवा हरितालिका स्थापना ह्यापैकी कोणताही दिवस चालू शकतो. आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने आपली प्रकृती तपासून उपवास करण्यास काहीच हरकत नसते.

एकादशी असो किवा चतुर्थी, उपासनेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने दिवसातून दोन वेळा गरम पाण्याने स्नान केले तर पावसाळ्याच्या दमट हवेने मंदावलेले रक्ताभिसरण वाढायला मदत होते. उपवास दिवशी शांत बसणे (मौन पाळणे अशक्य असल्यास), जप-जाप, ध्यान -धारणा, देवपूजा, योग-प्राणायाम केल्याने मेंदू जास्त कार्यान्वित होऊन इंद्रियांवर ताबा मिळवणे सोपे होते आणि मनावर आणि इंद्रियवर ताबा मिळवणे हीच तर मोक्षाकडे जाण्याची पायरी आहे.

धर्म – अर्थ -काम -मोक्षं हे चारही पुरुषार्थ या योगाने साधण्याचा लाभ आपण घेऊ शकतो.

उपवास मोजून करावेत का?

नाही. आपल्या वय, प्रकृती, बल, काल आणि व्याधी यानुसार उपवासची योजना करावी. जेणे करून आपण आपले आरोग्य अबाधित ठेऊ शकतो.

उपवास करण्यास सुरुवात केल्यावर मांसाहार पूर्णपणे सोडावा का?

हो आयुर्वेद शास्त्रानुसार मांसाहार हा पचण्यास जड असतो, मांस शिजण्यासही वेळ लागतो. पचण्यास जड असे अन्न पदार्थ खाल्यास निरनिराळ्या तक्रारी जाणवू लागतात. शिवाय मांसाहार केल्याने तमोगुण (तामस प्रवृत्ती) वाढून मनाची चंचलता, वजन वाढणे, ग्लानि, आळस उद्भवतो. खरे तर मांसाहार हा जिभेने पाणी पिणार्याव प्राण्यांचा आहार आहे, मनुष्याचा नाही.

जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य शुद्ध आणि सात्विक असावे. कारण आयुर्वेद शास्त्रानुसार उपवास हा आपण शरीराला आणि आपल्या इंद्रियना विश्रांति मिळावी म्हणून करतो.

लक्षात घ्या जितके पदार्थ तुमच्या ताटात वाढतील तितके तुमचे पोट हे तुमच्या पाठीपासून लांब राहील.
||हलके अन्न खा, सात्विक अन्न खा, मस्त रहा, स्वस्थ रहा||

 

Written By…

Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. 

Contact today to book an appointment.

उपवास कसा करावा – आयुर्वेदानुसार शास्त्रीय विवेचन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *